कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच; भिलवडीमध्ये मृत मासे
भिलवडी - कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच पडल्याचे दिसून येत असून, कृष्णा नदीकाठ परिसरातील कारखान्यातून सोडलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळेच कृष्णा नदी पात्रातील मासे मृत झाल्याची चर्चा कृष्णाकाठी रंगली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.याचा फायदा घेत कारखानादारांनी कारखान्यातील रसायनयुक्त पाणी कृष्णा नदी पात्रामध्ये सोडले असल्यामुळे जलचर प्राण्यांना धोका निर्माण होत आहे.नदी पात्रातील मासे या रसायन मिश्रित पाण्यामध्ये मृत्यूमुखी पडत असून नागठाणे,आमणापूर, अंकलखोप, औदुंबर, भिलवडीसह कृष्णाकाठावरील इतर गावांमध्ये कृष्णा नदी पात्रामध्ये मृत माशांचा खच पडल्याचे दिसून येत आहे.अनेक गावातील लोक नदी किनारी आलेल्या माशांना पकडण्यासाठी नदी किनारी गर्दी करीत आहेत.या रसायनयुक्त पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच मानवांच्या आरोग्यासही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासनाने संबंधित घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कृष्णाकाठच्या नागरिकांमधून होत आहे.
Comments
Post a Comment