कडेगांव तालुक्याला व्हेंटिलेटरचे सहा बेड देणार : खासदार संजय पाटील : कडेगांव प्रांताधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक
बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकाऱ्यांना १ हजार रुपये दंड : वांगी येथे ऑक्सिजनचे ३० बेड सुरू होणार
कडेगाव :-
कडेगाव तालुक्यात कोरोना महामारी मध्ये प्रशासनाने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण आहे. सध्या तालुक्यात ऑक्सिजनचे ४० बेड असले तरी व्हेंटिलेटर बेड एकही नाही. तालुक्यातील चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालय आणि कडेगांव येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी ३ असे एकुण ६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली.
कडेगांव येथील प्रांताधिकारी कार्यालयात खासदार संजय काका पाटील यांनी तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, कॉंग्रेसचे युवा नेते हिम्मतराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, अ.शांता कंनुजे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी तालुक्यातील एकुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, होम क्वॉरंटाईन रुग्ण, उपलब्ध ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, उपलब्ध औषधे, तालुक्यात झालेले लसीकरण याबाबत सविस्तर माहिती घेतली.
यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले, सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झाली आहे. या कालावधीत झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. कडेगांव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. तालुक्यात एक ही व्हेंटिलेटर बेड नसताना प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे मृत्यू चे प्रमाण अतिशय कमी आहे. कडेगांव तालुक्यातील चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालय आणि कडेगांव ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी ३ असे एकुण ६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. लवकरच हे बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच तालुक्यात अजून ऑक्सिजन चे बेड वाढविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे अशी सूचना केली.
ते म्हणाले, या महामारीचा आपणास समर्थपणे मुकाबला करायचा आहे. जे रुग्ण होम क्वॉरंटाईन आहेत. ते बाहेर रस्त्यावर फिरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्यावर पोलीस यंत्रणेने कारवाई केली पाहिजे. तालुक्यात लसीकरण मोहिम राबविताना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रांना समान लस उपलब्ध करून देण्यात यावी. जे रुग्ण रुग्णालय किंवा होम क्वॉरंटाईन मध्ये आहेत. त्यांना औषधोपचार कमी पडला नाही पाहिजे. अवश्य असलेली औषधे व रेमडीसिव्हीर इंजेक्शन दररोज मागणी केली पाहिजे. मागणी प्रमाणे औषधे देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.
प्रांताधिकारी गणेश मरकड म्हणाले, तालुक्यात चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालय आणि कडेगांव ग्रामीण रुग्णालय तसेच कडेपूर येथील एका खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अकरा उपकेंद्रामध्ये लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात ४५ वर्षांवरील ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कंन्टेनमेंट झोन ची अंमलबजावणी कडकपणे राबवली जात आहे. तसेच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबातील सदस्यांचे विलगीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. वांगी येथे ऑक्सिजनचे ३० बेड सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कडेगांव येथील बॅंक ऑफ इंडिया मध्ये सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्यामुळे बॅंकेचे शाखाधिकारी यांना १ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, कडेगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, चिंचणी (वांगी) ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.पोर्णिमा शृंगारपुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशा चौगुले, कडेगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग भोपळे, कडेगांव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आषिश कालेकर, भाजपा युवा नेते कृष्णत मोकळे, विशाल मोहिते, सुनील मोहिते (कॅप्टन) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी यांच्या कामाबाबत खासदार नाराज
कडेगाव येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांच्या कडून पैसे घेतल्याचा मुद्दे चर्चेत आल्यानंतर खासदार संजय पाटील चांगलेच भडकले. तसेच कडेगांव शहरात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण असताना ही रुग्ण आणि त्या कुटुंबातील सदस्य बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात नगरपंचायतीचे नियोजन नसल्याचे समोर येताच खासदार संजय काकांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांना अॅक्टीव्ह मोडवर येवून काम करा. कंन्टेनमेंट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच ज्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या कडून पैसे घेतले आहेत ते तातडीने परत देवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
Comments
Post a Comment